पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१३ : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथे कारवाई करत ११६ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज पकडले. मुंबई येथील एका व्यक्तीकडून ड्रग्ज खरेदी करून ते पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी करण्यात आली.
रामकुमार रामसजीवन मिश्रा (वय ४५, रा. नालासोपारा, पालघर. मूळ रा. उत्तर प्रदेश) व अब्दुल मुशरफअली कलीम उर्फ सिद्दिकी (वय ३५, रा. कुदळवाडी, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी चिखली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी-कुदळवाडी रोडवर वडाचामळा येथे दोघेजण संशयितपणे थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लाऊन रामकुमार आणि अब्दुल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केली असता मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी त्या ठिकाणी आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दोघांची झडती घेतली असता दोघांकडे ११६ ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्ज, दोन दुचाकी, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकूण १३ लाख ३५ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या दोघांकडून जप्त केला आहे. आरोपींनी हे ड्रग्ज गोरेगाव मुंबई येथून महंमद शकील उर्फ गुप्ता (रा. भगतसिंगनगर, गोरेगाव, मुंबई) यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे महंमद शकील उर्फ गुप्ता याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांमध्ये मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीची पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढ झाली आहे अनेक ठिकाणी अशाप्रकारे या विषारी ड्रग्सची विक्री केली जात आहे. अल्पवयीन विद्यार्थी तसेच समाजातील होतकरू मुलं या ड्रग्जची शिकार होऊन स्वतः चे आयुष्य उध्वस्त करत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने मुख्य आरोपींविरोधात कठोर अशी कारवाई करत या विषारी ड्रग्स चे अस्तित्व संपवाव अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.












