पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१८ : पिंपरी चिचवड शहरात व्यावसायिक इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात असून दिवसेंदिवस नवीन इमारतींची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. या अधिनियमातील कलम ३(१) प्रमाणे कोणत्याही इमारतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपयायोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, तसेच कलम ३(३) नुसार, परवाना प्राप्त संस्थांकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र महापालिका अग्निशमन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटाधारकांची आहे.
शहरात आगीच्या घटना घडू नयेत तसेच घटना घडल्यास जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी व्यावसायिक इमारतींमध्ये आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कंत्राटदार किंवा भोगवटदार याकडे दुर्लक्ष करत असून आग लागल्यानंतर या बाबी उघडकीस येतात. शहरातील व्यावसायिक इमारतींतील अग्निशमन यंत्रणांवर लक्ष ठेवणे अग्निशमन दलाला शक्य नसते, त्यामुळे यावर उपाय म्हणून महिला बचत गटांच्या महिलांची मदत घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास प्राप्त होणाऱ्या वर्दीची संख्या विचारात घेता, त्यामध्ये व्यावासायिक मिळकतीची संख्या अधिक आहे. या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे यांचेकडील अधिकृत महिला बचत गटांच्या महिलांकडून पिंपरी चिचवड क्षेत्रातील व्यावसायिक इमारतींचे अग्नीप्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
प्रत्येक व्यावसायिक इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कोणत्या स्थितीत आहे याची छायाचित्रे, दिलेले परवाने, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे अग्निशमन विभागाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
तरी, पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्व व्यावसायिक मिळकतींनी, इमारतीच्या मालकांनी किंवा भोगवटदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्रिशमन विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे यांचेकडील अधिकृत महिला बचत गटाच्या महिलांना अग्नीप्रतिबंधात्मक सर्वेक्षणाकरिता आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.












