पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०९ : चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.वैभव शैलेश गायकवाड उर्फ कुणाल गौतम कावरे ( वय २३, रा. गायरान वस्ती, केशवनगर मुंढवा, पुणे ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी याने त्याच्या साथीदारांसह चंदननगर, विमानतळ, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, सत्तुर, कोयता या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांचा वापर करणे तसेच गंभीर दुखापती सह दरोडा, जबरी चोरी, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांपासून त्याच्या विरुद्ध सहा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
त्याच्या परिसरातील दहशतीमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्यापासून आपले नुकसान होईल या भीतीपोटी नागरिक तक्रार दाखल करण्यास पुढे येत नव्हते.त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची चौकशी करून त्याच्या विरुद्ध एम.पी. डी. ए. कायद्या अंतर्गत मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे पाठवून स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, श्री राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे व श्री राजु बहिरट, पोलीस उप-निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.












