पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२८ :लोणीकंद परिसरात गावठी दारू विकणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुरुनाथ ऊर्फ महेश जालिंदर कांबळे (वय ३२ रा. एस टी कॉलनी वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही ३४ वी कारवाई आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून काही साथीदारांसह लोणीकंद पोलीस स्थानकाच्या हद्दीत गावठी दारू तयार करणे व विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी होता. आरोपी विरोधात मागील पाच वर्षां मध्ये आठ गुन्हे दाखल आहे. आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरात नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच सदर परिसरात आरोपीच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास धजावत होते.
सदर आरोपी विरोधात पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये १ वर्ष करिता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानंद पवार व विश्वजित काईगंडे आणि लोणीकंद पोलीस स्टाफने पार पाडली आहे.












