शिंदेच्या आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॉबीत राडा झाल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.यानंतर भरतशेठ गोगावले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी मधस्थी केली. दोघांच्या भांडणानं विधीमंडळाच्या लॉबीत खळबळ माजली. रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या राड्यावरुन शिंदे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान असं काही झालंच नसल्याचा दावा शंभुराज देसाई यांनी केलाय. विधिमंडळात राडा झाल्याचा काय पुरावा आहे? तिथे कोणताही कॅमेरा नाही. मग राडा झाला असं कोण म्हणत? असा उलटप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला. आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली नाही. चर्चा करताना दोघांचा आवाज वाढला असे, शंभुराज देसाई म्हणाले.
आताही सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे. निवडणुका होईपर्यंत अजून काय काय होतंय हे पाहा, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले. या सरकारमध्ये कोणाला शिस्त नसल्याचे ते म्हणाले.
असा कुठलाही वाद झालेला नाही. आम्ही सर्व एकत्र तिथं होतो, चहाही घेतला सोबत. पण वाद झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदारही त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे हे सभागृहात गेल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या वादामुळे एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये वाद झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरु झाल्या आहे
महायुती सरकारमध्ये एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये अशाप्रकराची धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच घटना आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यात आता या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे. दरम्यान महेंद्र थोरे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये वाद झाला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी त्यांच्या मध्यस्थी केली आणि त्यांनाथांबण्याचा प्रयत्न केला.