शहरात जबरी चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे.असहीच एक घटना लोहगाव परिसरात घडली आहे.
दि. १३/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे लोहगांव स्मशान भुमी येथे रात्रीच्या वेळी रिक्षा घेऊन जात असताना चार अनोळखी इसमांनी त्यांना काठीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचा मोबाईल हॅन्डसेट व रिक्षा क्र. एमएच / १२ / जेएस / ५८८५ ही जबरदस्तीने हिसकावली.तसेच त्याच रिक्षात फिर्यादी यांना धाक दाखवुन बळजबरी शहरात इतरत्र फिरवुन पुन्हा मारहाण केली. व अंधारात सोडुन रिक्षा व मोबाईल फोन घेऊन आरोपी फरार झाले आहेत.
गुन्हे शाखा युनिट-४ मधील सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार, संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुँवर या पथकाने घटनास्थळ व आजुबाजुच्या ठिकाणी उपलब्ध असलेले सी. सी. टिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले.
तपास करीत असताना तपास पथकास दि १७/०६/ २०२३ रोजी माहिती मिळाली की रिक्षा चालकास मारहाण करुन त्यास
पळवून नेऊन लुटणारे अजिंक्य मोहिते व राहुल थोरात हे लोहगांव ते खराडी रोडवरील फॉरेस्ट पार्क जवळील नाल्याच्या शेजारी चोरलेल्या रिक्षात बसलेले आहेत. नमुद माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांना दिली.त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखा युनिट-०४ च्या पथकाने लोहगांव ते खराडी रोडवरील फॉरेस्ट पार्क लगत असलेल्या नाल्याचे जवळ चोरीची रिक्षा पार्क करून बसलेले रेकॉर्ड वरिल आरोपी राहुल राजु थोरात ( वय २८ वर्षे, रा. विश्वराज हॉस्पिटल समोर, लोणी-काळभोर, पुणे ) अजिंक्य प्रकाश मोहिते ( वय २८ वर्षे, रा. पवार वस्ती, शिवराज कॉलनी, लोहगांव, पुणे ) यांना ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातुन चोरलेली बजाज अॅटो रिक्षा क्र. एमएच/ १२ / जेएस / ५८८५ व एक रेडमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जप्त केला.
त्यांच्याकडे केलेल्या तपासात दाखल गुन्हा बबल्या ऊर्फ अजय अशोक कसबे ( रा. वडार वस्ती विश्रांतवाडी पुणे ) अरुण राजु पिल्ले, ( रा. संतनगर, लोहगांव पुणे ) यांच्या मदतीने लोहगांवातील स्मशान भुमीजवळ रिक्षा ड्रायव्हरला मारहाण करुन त्याला रिक्षात सिट मागील बाजुस बळजबरीने बसवुन त्याचे ताब्यातील रिक्षा व मोबाईल हॅन्डसेट जबरीने काढून घेतला तसेच रिक्षा ड्रायव्हरचे अपहरण करून त्यास रिक्षात मारहाण करुन अंधारात सोडुन पळुन गेल्याचे सांगितले.
आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम ३६५.३९४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन्ही अटक आरोपींविरुध्द यापुर्वी गुन्हे दाखल असुन ते सध्या जामिनावर आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विकास जाधव, सहा. पोलीस फौज महेंद्र पवार, पोलीस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, नागेशसिंग कुंवर यांनी केली आहे.












