आगामी लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
यावेळी लोकसभेच्या निवडणुका ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असे मानले जात आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं होतं. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं २०१४ च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपनं २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३७.७ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला ४५ टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या होत्या.