पिंपरी(प्रतिनिधी)
चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब.तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, वर्ल्ड ऑफ़ हॉलिडेजच्या व्यवस्थापिका पूनम सणस आणि तेलंग हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. अजयकुमार एम. राय उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट पर्यटन स्थळाची माहिती देणारे भित्तिचित्र स्पर्धेत दिशा सोनार, ओमकार केंगळे,पायल गौड तर
वकृत्व स्पर्धेत अथर्व कुऱ्हाडे,उल्का कुलकर्णी,तन्मय नांगरे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. तर
उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत शिफा सिंग, संध्या सिंघल,संजना बिराजदार,शीतल भुजबळ,ऐश्वर्या सरोदे यांना विजेते म्हणून बक्षिसे देण्यात आले.
यावेळी श्री हरणे म्हणाले की, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम, आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जो देश स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करील, लोकांना आकर्षित करील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनामुळे खूप मदत होणार आहे. सिंगापुर सारखे काही देश पर्यटन या क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहेत.
पूनम सणस म्हणाल्या की, आज भारतात पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधत असताना आपण सर्वांनी पृथ्वीवर असणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने व जपून वापर केला पाहिजे. तर पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात. पर्यटन व्यवसायाची उलाढाल पण अब्जावधी रुपयांत गेली आहे. स्थानिक पातळीवर जनतेला रोजगार संधी पर्यटनामुळे उपलब्ध होत आहे.
यावेळी प्राचार्य राय म्हणाले की, अनेक देशांची आर्थिक स्थैर्य केवळ पर्यटनावर अवलंबून आहे. कमी गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती आणि मानद सचिव बी.व्ही.जावळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. वैष्णवी हरडे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. तर प्रा. शेखर खैरनार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.












