पुणे: महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन न्युड व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून मुलीने राहत्या घरात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रुक येथे जानेवारी २०२३ ते शुक्रवार (दि. १२ एप्रिल) दरम्यान घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पीडित १७ वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि.१२) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन कपिल रविंद्र वाल्हेकर (वय-१८ रा. कोथरुड, पुणे) याच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३७६/२/एन, ३७६/२/जे, ५०६, ४२७ सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सिंहगड कॅम्पस मधील सौ. वेणूताई पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आरोपी कपिल याने जानेवारी २०२३ मध्ये तरुणीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर कपिल याने तिच्या घरी जाऊन ती एकटी असल्याचा गैरफायदा घेतला. त्याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
कपिल याने मुलीकडे न्युड व्हिडीओ काढण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला असता आरोपीने बाथरुमची काच फोडून मुलीचा न्युड व्हिडीओ बनवला.
हा व्हिडीओ मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान ८ एप्रिल रोजी आरोपीने मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिला टॉर्चर करण्यास सुरुवात केली. आरोपीकडून होत असलेल्या सत्तच्या त्रासाला वैतागून मुलीने राहत्या घरात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आरोपी कपिल याने शुक्रवारी (दि.१२) मुलीला फोन केला. त्यावेळी तिने त्याला घरी बोलावून घेत आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी कपिल विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कपिल वाल्हेकर याला अटक केली आहे. पुढील तपास भरती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.