पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : अवयवदानासाठी सलग 34 वर्षे जनजागृती आणि प्रचाराचे मोलाचे काम करणाऱ्या अरुण देवगांवकर यांचा आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
आयुष्याची लढाई लढत असताना उपचार सुरू असलेल्या गरजू रुग्णाला वेळेत अवयव मिळणे खूप गरजचे असते. नातेवाईकांच्या भावनिक प्रेमामुळे अवयवदान करवून घेणे कठीण असते. अवयवदानासाठी जनजागृती करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचा फौंडेशनतर्फे दरवर्षी गौरव केला जातो. यंदाचा कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि.16 सप्टेंबर रोजी दुपारी 2:45 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोहिनूर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आप्थॅलमॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. फॅमिली फिजिशियन व आयएमएचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.












