पिंपरी ३. सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचा एक भाग म्हणून समाजातील सर्व घटकांनी भारतीय अवयव दान मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आवाहन प्राचार्य (प्रो.) डॉक्टर माधव सरोदे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “३ ऑगस्ट भारतीय अवयव दान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर प्रसंगी जिजामाता हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भामरे यांनी अवयवदानाची गरज व महत्त्व यावर मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली डोने यांनी क्षयरोग निर्मूलनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी अवयवदानविषयक पोस्टर प्रदर्शन व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. संदीप नन्नावरे यांनी केले. अवयवदान प्रतिज्ञेचे वाचन डॉ. वैशाली खेडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार किशोर गवळी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले.
अवयव दानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी – प्राचार्य (प्रो.) डॉ. माधव सरोदे












