मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आई-बहिणीचा उल्लेख केला होता. त्यानंतर राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला पण आता स्वता मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यांना काय चौकशी करायच्या आहेत त्या ते करु शकतात असंही ते म्हणाले आहेत.
“विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विधानावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. छत्रपतींचे विचार सोडता का? असं त्यांनी मला विचारलं आहे. माझ्याकडून अनावधानाने ते शब्द वापरले गेले. माझ्या तोंडून आई-बहिणीचा उल्लेख झाला असेल तर ते मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण आई-बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नाही. मीदेखील छत्रपतींचे विचार मानतो,” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकाही केली. “नेटवर्क बंद करणं, लोकांमध्ये वातावरण निर्माण करणं ही सगळी देवेंद्र फडणवीसांची किमया होती. पण मी राज्यात अशांतता निर्माण होऊन देणार नाही. त्यांचा डाव हाणून पाडणार. शांततेत आंदोलन करणार. कायमस्वरुपी सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मी मागे हटणार नाही. तोपर्यंत त्यांना काय चौकशा कराव्यात त्या करु देत”, असं आव्हानच त्यांनी दिलं.
सध्या माझी प्रकृती अत्यंत चांगली आहे. 17 दिवस उपोषण केल्याने फार त्रास झाला. पण डॉक्टरांनी चांगले उपचार दिले. अजून काह दिवस राहावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे.