पुणे : पुण्यातील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करुन त्यावरील बातमीपत्रांचे छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीकडून घेण्यात आल्यानंतर पुणेकरांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पुण्याचे शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, ऐतिहासिक तसेच राजकीय महत्त्व लक्षात घेता प्रसारभारतीने आकाशवाणीच्या पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्राद्वारे केली होती.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्राची दखल घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. याबाबत एक पत्रक देखील जारी केले गेले आहे.
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रक्षेपण होणारे प्रादेशिक बातमीपत्र बंद करु नये, यासाठी आज सकाळीच मी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर यांना पत्र लिहून विनंती केली होती. पुणेकर आणि लोकभावनेचा आदर करुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली. त्याबद्दल माननीय अनुरागजी ठाकूर यांचे मनापासून आभार पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.
आकाशवाणीचे प्रादेशिक बातमीपत्र बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती












