पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०४ : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने दरवर्षी गौरविले जाते. यंदाचा ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण दि. 7 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार असून पुरस्कार वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे संचालक सचिन ईटकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आडकर फौंडेशन गेली 28 वर्षे ॲड. आव्हाड यांचा वाढदिवस साजरा करीत आहे. ॲड. आव्हाड यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कर्तृत्ववान व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असल्याचे ॲड. आडकर यांनी सांगितले.












