पिंपरी – जेव्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती तेव्हा त्यांचे हक्काचे असे पोलीस आयुक्तालय नव्हते. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर काही काळापुरते आयुक्तालय सुरु करण्यात आले. मात्र आयुक्तालयाची हि जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र जागा मिळावी म्हणून शासनाला प्रस्ताव पाठवला. प्रशासनाला पाठवलेला हा प्रस्ताव अर्ध्यावर न सोडता त्यांनी या प्रस्तावाचा पुरेपूर पाठपुरवठा केला. आणि त्याचमुळे त्यांना शेवटी यश मिळाले आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र हक्काची जागा त्यांना मिळाली.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती 15 ऑगस्ट 2018 मध्ये करण्यात आली. आयुक्तालयाचे कामकाज 2018 मध्ये सुरु झाले. परंतु, मागील पाच वर्षात आयुक्तालयाला हक्काची जागा मिळालेली नाही. देहूगाव गायरान येथील 50 एकर जागा पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी देण्याबाबत राज्य सरकारने मान्यता दिली होती. मात्र, या जागेला देहू संस्थान, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यानंतर मोशी येथील गायरान जागेचीही पोलीस आयुक्तलयासाठी पाहणी केली. मात्र, त्या जागेचाही पर्याय मागे पडला.
आणि आता तब्बल पाच वर्षांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयास 15 एकर जागा देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या मालकीची वाकड पेठ क्रमांक 39 येथील डिस्ट्रीक सेंटरमधील 15 एकर जागा वाणिज्य चालू दरपत्रकानुसार पोलीस आयुक्तालयाला देण्यास राज्य शासनाने 28 फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे. हे ठिकाण मध्यवर्ती असुन प्रशासकीय व नागरिकांसाठी फायद्याचे आहे.
लवकच या जागेवर कार्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी सतिश माने यांनी दिली. एवढेच नाही तर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने यासाठी जागा मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला. आणि अखेर ५ वर्षांनी त्यांच्या या कमला यश मिळाले.