उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा पार्थ पवार याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. एक निवडणूक सोडली तर राजकीय, सामाजिक क्षेत्राशी थेट संबंध नसलेल्या पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा का दिली, त्यांना नेमका कोणापासून धोका आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकारावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात अनेकांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.
जयंत पाटील इतकंच म्हणाले की, आम्ही मुलांबाबत काही बोलू इच्छित नाही, आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले यासाठी गृहमंत्र्यांचे आभार.
कोण आहेत पार्थ पवार
पार्थ पवार हे अजित पवारांचे पूत्र आहे. त्यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पदवीनंतरच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले होते.