पुणे | प्रतिनिधी
पुणे : कोरोना महामारीच्या संकट काळात स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून जनसामान्यांच्या मदतीसाठी सेवाकार्यास वाहून घेतलेल्या आयटी अभियंता विनोद पाटील यांना जागतिक दर्जाचा इन्सपिरिंग ह्यूमन सेवाकार्यातील पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी परिसर व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या कठीण काळात या अभियंत्याने जीवाची पर्वा न करता सेवाकार्यात झोकून काम केले. प्रसंगी स्वतः या आजाराशी लढा दिला. घरापासून दूर राहून सामाजिक जाणीवेतून लोकांचे समुपदेशन, सरकारी कोरोना उपचार केंद्राची माहिती देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कोरोना टेस्टिंग सेंटरवर कोरोनाबद्दल नागरिकांची भीती दूर करण्यासाठी त्यांना धीर देत जनजागृती करणे.
स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून जनसामान्यांच्या आधारासाठी सेवाकार्य केले. लॉकडाऊनच्या काळात सांगवी, पिंपळे निळख, पिंपळे सौदागर व परिसरातील मित्र परिवाराला व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एकत्र केले. या कठीण काळात या ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना अन्नपदार्थ, जीवनावश्यक साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवले.
एकीकडे शहरातील स्मशानभूमीत शव दाहीण्यांचा दाह धगधगत होता. तर दवाखान्यात जागा मिळत नव्हती, त्या उलट स्मशानभूमीचीही परिस्थिती होती. अग्निसंस्कारासाठी सख्खी नाती पुढे येत नव्हती, अशा परिस्थितीत या अभियंत्याने मदतीचा मोर्चा स्मशानभूमीकडे वळविला. सामाजिक जाणीवेतून एकूण 64 जणांना अग्निसंस्कार दिले. एक मूठ धान्य भुकेल्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलक, सांगवी येथील मोठ्या सोसायट्यांमधून प्रबोधन करत धान्याचे संकलन करून ते गरजू विद्यार्थी, कुटुंबांपर्यंत उपलब्ध करून देण्याचे सेवाभावी कामही त्यांनी सुरू केले.
मूळ जळगाव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विनोद पाटील यांना आई वडील पत्नी व मुलीचा या सत्कार्यात पाठिंबा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्स दरवर्षी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना इन्स्पायरिंग ह्यूमन हा जागतिक दर्जाचा पुरस्कार देऊन गौरव करते.
2023 या वर्षात संस्थेकडे जगभरातून तीन हजारांहून अधिक नामांकन प्राप्त झालेल्या आहेत. यातून संस्थेने अंतिम २० जणांची निवड केली आहे. यात पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून या पुरस्कारासाठी आयटी अभियंता विनोद पाटील यांच्या सेवा कार्याची दखल घेत एकमेव निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे त्यांची आयटी हब मित्रपरिवार व पिंपरी चिंचवड शहरातून कौतुक होत आहे.
आयटी अभियंत्याला जागतिक दर्जाचा इन्स्पायरिंग ह्यूमन हा पुरस्कार देऊन गौरव












