आळेफाटा येथे बिबट्या शिरला चक्क हॉस्पिटलमध्ये; वनरक्षकावर केला हल्ला तर बिबट्याला पकडण्यासाठी मोठी कसरत
मागील काही महिन्यात पुण्यात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्या शेतात, घराबाहेर फिरण्याचे प्रसंग वारंवार घडताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात बिबट्याने चाकण येथे दोन गुरांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. अशातच मंगळवारी रात्री आळेफाटा येथे एक बिबट्या चक्क रुग्णालयात शिरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बिबट्याने एका वनरक्षकावर हल्ला देखील केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहीती अशी, की भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात शिरला. रात्रीचे साडेनऊ ते दहाची वेळ असल्याने रुग्णांचे वॉर्ड बंद होते. यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी वनरक्षकांना बिबट्याला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बिबट्या हॉस्पिटलमध्ये शिरताच वनरक्षकांना तातडीने बोलवण्यात आले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी बिबट्याने कैलास भालेराव या वनरक्षकांवर हल्ला केला. ह्या हाताला त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना टाकेही पडले आहेत.
या दरम्यान बिबट्या एका खिडकीतून उडी मारून दुसऱ्या पत्र्यावर गेला आणि तिथून जंगलात पसार झाला. बिबट्या भक्ष्याच्या शोधात आता शहरात शिरत आहे. त्यामुळे वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.