पिंपरी- इलेक्ट्रोरोल बॉंड बाबत केंद्र सरकारने श्वेतपत्रिका जारी केली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली.त्या म्हणाल्या, या बॉंडबाबत जी यादी प्रसिध्द झाली ती धक्कादायक आहे. ज्या गँम्बलिंग कंपनीवर ईडीची कारवाई झाली त्या कंपनीसह इन्फ्रास्ट्रक्चरमधील कंपन्यांना हे बॉंड घ्यायला लावले आहेत, कंपनीवर कारवाई झाल्यानंतर हे बॉंड खरेदी होत असतील तर या सगळ्याच प्रकाराची चौकशी व्हायला हवी, केंद्राने या बाबत श्वेतपत्रिका जारी करणे गरजेचे आहे. कोणत्या पक्षाने हे बॉंड घेतले कोणाला दिले याचा एक चार्ट पारदर्शकपणे प्रसिध्द व्हावा या बाबत दूध का दूध व्हायला हवे.
राष्ट्रवादीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे निरिक्षण नोंदविले त्या बाबत न्यायालयाचे आभार मानताना सुळे म्हणाल्या, या बाबत मंगळवारी अंतिम निर्णय येईल, त्या दिवशी पूर्ण चित्र स्पष्ट होईल. पवारसाहेबांचा फोटो न वापरण्याविषयी दिलेल्या निर्देशांचे त्यांनी स्वागत केले. या बाबतचा पूर्ण निकाल आल्यानंतर या बाबत सविस्तर बोलेन. विरोधातील खासदार असेल तर निधी मिळताना अडचणी होतात असे अजित पवार बारामतीच्या सभातून बोलले होते, त्या बाबत विचारता सुळे म्हणाल्या, मी वैयक्तिक मोदी किंवा शहा किंवा भाजपच्या कोणत्याही मंत्र्यांवर वैयक्तिक टीका केलेली नाही. मी काय काम केले याचा अहवालच प्रसिध्द केला आहे.
आमची लढाई वैयक्तिक नाही, धोरणात्मक विरोध आहे. भाजपवर टीका करते कारण त्यांनी कांदा निर्यातबंदी केली, दुधाला भाव, सोयाबिनला भाव ही धोरणे शेतकरीविरोधी नाहीत का, शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी शासनाने काय केले, नोक-याच मिळणार नसतील तर त्यांच्यासाठी कोणी लढायला नको का…भाषण करण्यासाठी तर संसद आहे. इंधन दरवाढीचे खापर कंपनीवर फोडता व दरकमी झाले की सरकारला श्रेय का देता, निवडणूक आल्या आहेत आता गाजरांचा पाऊसही पडू शकेल. ईडी सीबीआय इनकमटॅक्स या स्वायत्त संस्था होत्या आता अदृश्य शक्ती सातत्याने या संस्थांचा वापर करत आहेत, त्या मुळे दडपशाही वाढत चालली असून लोकशाही गेले पंधरा वर्षे त्यांच्याच (अजित पवार) विचाराचाच खासदार होता, ज्या चर्चेत सहभागी झाले, त्या चर्चेवरील उत्तर देताना सर्व मंत्र्यांनी माझा आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे.
रस्ते, पाणी, फलोत्पादन विभाग, शाळा सगळयांची झालेली कामे मी नमूद केलेली आहेत. विजय शिवतारे निवडणूक लढविणार आहेत, त्या बाबत विचारले असता लोकशाहीत सर्वांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, जितके जास्त लोक निवडणूक लढवतील तितकी चांगलीच गोष्ट आहे असे त्या म्हणाल्या.