पुणे प्रतिनिधी
पुणे 7 : पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांने अवैध दारू विक्री आणि खरेदी विरोधात व्यापक कारवाई केली आहे. या छाप्यांदरम्यान 54.94 लाख रुपयांची दारू आणि कच्चा माल जप्त केला. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे टाकले असून एकूण ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या दारूमध्ये गोव्यात उत्पादित केलेल्या आणि गोव्याबाहेर विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या दारूचाही समावेश आहे. याशिवाय, अधिकाऱ्यांनी देशी दारू बनविणाऱ्यांच्या ठिकाणी छापे टाकले. देशी दारू, विदेशी मद्य, बीअर, वाईन, गोव्याबाहेर विक्रीसाठी बंदी असलेली दारू, अवैध दारू, ताडी आणि दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल जप्त केलेल्या साहित्यात समाविष्ट आहे. या दारूच्या वाहतुकीसाठी वापरलेली वाहनेही जप्त करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही विशेष मोहीम राबवली. ही मोहीम सुरूच राहणार असून, पुणे विभागात अवैध दारू विक्री व खरेदी करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.












