पिंपरी – भाजपाने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप काही जागांवरून अजूनही अडलेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर गेले आहेत, असे वृत्त एका मराठा वृत्तवाहिनीने दिले आहे.
येत्या काही दिवसात कधीही लोकसभा निवडणुक जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप पूर्ण करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. आज उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असून त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत सुद्धा आहेत.
दोन जागांबाबत तिढा सोडवण्यासाठी ठाकरे सिल्व्हर ओकवर गेल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे २३ जागांवर ठाम आहेत. यापैकी एक ते दोन जागा ते मित्र पक्षाला सोडतील. यानंतर ते २०-२२ जागा लढवू शकतात. कोल्हापूर, सांगली, भिवंडी इत्यादी जागांचा पेच आहे. याबाबत महाविकास आघाडीला लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बुलढाणा,
हातकणंगले, शिर्डी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम, मावळ, रायगड, रामटेक, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, कल्याण-डोंबिवली या २३ जागांवर लढण्यास इच्छूक असून तसा दावा करण्यात येत आहे. आता सिल्व्हर ओक वरील बैठकीत नक्की काय ठरतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.