पुणे प्रतिनिधी
पुणे दि.११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ १२ ऑगस्टपासून म्हणजेच शनिवारपासून पुणे नाशिक मार्गावर 16 ई-शिवाई बस चालवण्यास सुरुवात करणार आहे. एमएसआरटीसी पुणेचे उपव्यवस्थापक कैलास पाटील म्हणाले, “या 16 ई-शिवाई बसेसचे आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.
त्या शनिवार, 12 ऑगस्टपासून पुणे नाशिक मार्गावर धावण्यास सुरुवात करतील. या 16 बसेसपैकी, 8 बसेस पुणे विभागातून तर इतर 8 बसेस नाशिक विभागातून चालतील. ई-शिवाई बसेसची फ्रिक्वेन्सी दर 1 तासाला असणार असून दिवसातील पहिली बस सकाळी 6 वाजल्यापासून धावणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
सुरुवातीला नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ई-शिवाई बस शिवाजीनगर बसस्थानकावरून सुटतील. गरज भासल्यास मागणीनुसार अन्य बसस्थानकातूनही बसेस धावतील. एसटी महामंडळाकडून पाच हजार ई-बस घेतल्या जाणार आहेत, हे विशेष. त्या ई-बस राज्यात ‘ई-शिवाई’ नावाने चालवल्या जातील. या ई-बस टप्प्याटप्प्याने विविध विभागांना देण्यात येणार आहेत.
त्यानुसार काही विभागांना ई-बस मिळाल्या असून त्यांनी काही मार्गांवर ई-बस सेवा सुरू केली आहे. राज्यात सर्वप्रथम पुणे विभागात पुणे-नगर मार्गावर ई-शिवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर पुणे ते छत्रपती संभाजी नगर मार्गावर ई-शिवाई धावणार आहे. आता 12 ऑगस्टपासून या ई-शिवाई बसेस नाशिकच्या दिशेने प्रवास करतील.












