पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपतीची स्थापना झाली आहे. दर्शनासाठी अनेकांनी येथे हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री आणि आमदारांनी फडणवीसांच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि राज्यातील जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान इंदोर उद्योजक परमेश्वर येवले यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी इतरही पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान माध्यमांना बोलताना फडणवीस म्हणाले ‘गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर जी काही विघ्नं आहेत त्या सर्व विघ्नांना दूर करण्याची शक्ती गणपती बाप्पांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्हाला द्यावी, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे.
मला विश्वास आहे, याबाबतीत जो आशीर्वाद आम्हाला भेटणार आहे,त्या कारणाने महाराष्ट्र हा नंबर एकच राहणार आहे. आम्ही ‘ट्रिलियन डॉलर इकॉनोमी’ तयार करू व गरीब शेतकरी मजूर वर्ग हे जे आपले घटक आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आमचं सरकार नेहमीच कार्य करत राहील असंही फडणवीस यांनी सांगितले.












