पुणे : तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे ‘नादब्रह्मांजली‘ या गायन–वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खांसाहेब यांचे नातू आणि सुप्रसिद्ध तबलावादक सलीम अख्तर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे याप्रसंगी उपस्थित होते.
‘नादब्रह्मांजली‘ कार्यक्रम गुरुवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सलीम अख्तर यांच्या एकल तबला वादनाने होणार असून त्यांना शंतनू खेर हे लेहरा साथ करणार आहेत. त्यानंतर विदुषी मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना प्रशांत पांडव (तबला) आणि अभिषेक शिनकर (हार्मोनियम) साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रवींद्र खरे करणार आहेत.
उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांच्याविषयी..
उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांचा जन्म 1923 साली हरियाणातील पानिपत येथे झाला. वडील अल्लाउद्दीन खां हे प्रसिद्ध सारंगी वादक होते. वडिलांचा सारंगीचा रियाज सतत कानावर पडत असल्यामुळे त्यांच्यावर नकळत तालासुरांचे संस्कार होत राहिले. उपजत गोड गळ्यामुळे व घरातील सारंगी, हार्मोनियम व तबला या वाद्यांमुळे गाण्याच्या रियाजाबरोबरच तबल्यावरही त्यांची बोटे फिरू लागली. वडिलांबरोबर पाकिस्तान आणि तेथून परत मुबंईत आल्यानंतर त्यांचे उस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण सुरू झाले. मुंबईतील काही वर्षांच्या वास्तव्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांचा विवाह प्रसिद्ध सारंगी वादक उस्ताद मोहम्मद हुसेन खां यांच्या मुलीशी झाला. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित आप्पासाहेब जळगांवकर यांच्यासोबत त्यांनी शेकडो मैफिली रंगवल्या, गाजवल्या.
उस्ताद गुलाम रसूल खां साहेब यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, विदुषी डॉ. प्रभा अत्रे, उस्ताद बडे गुलाम अली खां, उस्ताद अमीर खां, बेगम अख्तर, उस्ताद नियाज अहमद – फैयाज अहमद खां, उस्ताद बरकत अली खां, उस्ताद गुलाम मुस्तफा खां, निर्मला – अरुण, लक्ष्मी – शंकर, विदुषी गिरिजा देवी, विदुषी हिराबाई बडोदेकर, पंडित सुरेश बाबू माने अशा अनेक नामवंत थोर गायकांबरोबर तबला साथ करून स्वतःचा ठसा उमटवला.












