
पुणेः प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन(पेरा) द्वारे येत्या २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पेरा प्रीमिअर चँम्पियनशिपचे एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
‘पेरा’ या संघटनेच्या वतीने आयोजित केली जाणारी ही प्रतिष्ठीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा असून तिच्यात यंदा महाराष्ट्रातील 35 हून अधिक विद्यापीठांतील 3,000 हून अधिक विद्यार्थी-खेळाडू 15 हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत. यंदा स्पर्धेचे यजमानपद भुषविण्याचा मान एमआयटी एडीटी विद्यापीठाला लाभला आहे.
या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, ‘पेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड,ऑलिंम्पियन बाॅक्सर मनोज पिंगळे, डाॅ.पी.ए. इनामदार विद्यापीठाचे डाॅ.गुलजार शेख, एमआयटी डब्लूपीयूचे पोपट धानवे आदी याप्रसंगी उपस्थित होते. विश्वराजबाग येथील एमआयटी एडीटीच्या क्रीडा संकुलात होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेत फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलपासून ते बास्केटबॉल, स्विमिंग, बॉक्सिंग, कबड्डी, खो-खो, टेनिस, टेबल-टेनिस, अॅथलेटिक्स, बुद्धिबळ अशा खेळांमध्ये या युवा खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील चमकते.
या क्रीडा महोत्सवाला शुभेच्छा देताना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड हे यावेळी म्हणाले की, पेरा प्रिमिअर चँम्पियनशिप ही केवळ एक स्पर्धा नाही तर ती विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती आणि टीमवर्क वाढवण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांतून ‘एमआयटी एडीटी’त येणाऱ्या खेळाडूंचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. तर डाॅ. चोपडे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून एमआयटी एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाशैली रुजविणार असून ज्यातून ते त्यांच्या भावी आयुष्यात राष्ट्रकुल,ऑलिम्पिकसारख्य़ा स्पर्धांपर्यंत जाण्यासाठी प्रेरित होतील.
पेराचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. पवार यांनीही चॅम्पियनशिपच्या सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देत माहिती दिली. ते म्हणाले, “पेरा प्रीमियर चॅम्पियनशिप ही अशी एक स्पर्धा आहे, ज्यातून विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रचंड वाव दिला जातो. या स्पर्धेत विद्यार्थी केवळ खेळ खेळत नाहीत; तर ते त्यांच्या समर्पण, चिकाटी आणि विजयाच्या कथा लिहितात. तर पद्माकर फड यावेळी म्हणाले की, “यंदाची चॅम्पियनशिप खेळाडूंच्या आठवणींमध्ये कोरली जाईल याची आम्हास खात्री आहे. सर्व सहभागी खेळाडूंना जास्तीत जास्त आराम आणि समाधान मिळावे यासाठी आम्ही सर्व तपशीलवार नियोजन केले आहे. त्यामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठातील क्रीडा सुविधा व आमचा पाहूणचार पाहूण खेळाडू नक्कीच भारावून जातील.
‘पेरा’ चॅम्पियनशिपचा उद्घाटन समारंभ विविध राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.२७) होणार असून समारोप सोमवारी तिचा समारोप होणार आहे.तरी अधिक माहितीसाठी पेराच्या संकेस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.












