पुणे प्रतिनिधी
पुणे : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह इतर पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सीईटी सेलकडून पुढील वर्षी एकूण २० प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांचे पुढील वर्षीचे संभाव्य वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, कृषी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी-सीईटी ही परीक्षा दि. १६ एप्रिल ते २ मे य कालावधीत होणार आहे. तब्बल पाच लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या सर्व परीक्षा मार्च ते मे या तीन महिन्यांत होणार आहेत.
सीईटीच्या २० परीक्षांपैकी २ परीक्षा या ऑफलाइन असणार आहेत. इतर सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. सीईटी सेलने यंदा २२ दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलांनी अशी एकूण ६ लाख ३६ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना आतापासूनच प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास आणि नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात गेल्या दोन वर्षांत बदल झाले होते. आता पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष सुरळीत होत आहे. सर्व सीईटी वेळेत पूर्ण करून त्यानंतर प्रवेश कॅप फेरीमार्फत प्रवेश प्रक्रियाही नियोजनबद्ध करता येणार आहे.
एमएचटी-सीईटी- १६ एप्रिल ते २ मे
बीएड-एमएड (३ वर्ष) २ मार्च
एमपीएड ९ व १० मार्च
एलएलबी (३ वर्ष) – ११ ते १३ मार्च
बीपीएड – १५ ते १८ मार्च
बीएड जनरल, स्पेशल – १८ ते २१ मार्च
एमबीए एमएमएस- २३, २४ मार्च
एमसीए- ३० मार्च
डिझाइन (ऑफलाइन) – ६ एप्रिल
एम आर्च – ७ एप्रिल
एम-एचएमसीटी – ७ एप्रिल
बी-एचएमसीटी – १३ एप्रिल
बी- प्लॅनिंग -१३ एप्रिल
बीए, बीएस्सी बीएड (४ वर्षे)- ६ मे
एलएलबी ५ वर्षे – ७ ते ८ मे
बीएस्सी नर्सिंग – ९ ते १० मे
एएनएम-जीएनएम – ९ ते १० मे
एएसी (ऑफलाईन) – १२ मे
पीजीपी, पीजीओ १२ मे












