पुणे, दि.०८ : एम.बी.बी.एस च्या वर्गात प्रवेश मिळवून देण्यासाठी एका महाविद्यालयाच्या डीन यांनी एका विद्यार्थ्याकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका फिर्यादी यांच्या तक्रारी वरून आशिष श्रीनाथ वनगिनवार ( वय ५४, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय,पुणे )या महाविद्यालयाच्या डीन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा सन २०२३ या वर्षात नीट च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.त्याची एम.बी.बी.एस. च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कंप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्युशनल कोटा मधून निवड झाली होती.
महाविद्यालयाच्या डीन यांनी प्रवेश देण्यासाठी महाविद्यालयाची वार्षिक फी २२,५०,००० आणि उर्वरित १६,००,००० रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली.
तक्रारदार यांनी आरोपीने त्यांच्याकडे लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा केली असता आरोपीने तडजोड करून १६,००,००० लाच घेण्याचे कबूल केले.आरोपीने १०,००,००० रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलिस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.












