पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर खोलवर रुजणारी कला आहे; ईश्वरापर्यंत पोहोचण्याची शक्ती संगीत या कलेत आहे. कलाकारांनी रसिकांच्या वैचारिक बैठकीची उंची वाढविण्याच्या हेतूने सादरीकरण करणे अपेक्षित आहे. रागदारी वादनाची वैभवशाली परंपरा कलाकाराने विकसित करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित दिलीप गायतोंडे (ठाणे) यांनी केले. एकल संवादिनी वादनाला मंच मिळवून देण्यासाठी कलाकार, अभ्यासकांनी प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ज्यांच्या विलक्षण गोडव्यातून पेटी गात आहे, असा अनुभव येतो असे ज्येष्ठ हार्मोनियम वादक कै. पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त पंडित तुळशीदास बोरकर शिष्य परिवार आणि संवादिनी प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते. एकल संवादिनी वादन आणि संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. पंडित गायतोंडे यांच्याशी प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्रीराम हसबनीस यांनी संवाद साधला. कलेचे प्रमाणीकरण करणे शक्य नाही. कला ही प्रत्येक कलाकाराच्या वैविध्यपूर्ण निर्मितीची प्रक्रिया असते, जी व्यक्तीसापेक्ष असते. त्यामुळे त्यात वैविध्यता असणे अपेक्षितच आहे. कलाकराला जे राग भावतात तेच त्याने सादर करावे. एखाद्या रागाचा आरोह-अवरोह माहित आहे म्हणून व्याकरणसदृश वादन नसावे, असे पंडित गायतोंडे म्हणाले. कलाकारांनी तालमीबरोबरच इतर कलाकारांचे गायन-वादन ऐकणेही अपेक्षित आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
पंडित गायतोंडे यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग रागेश्रीने केली. तीनतालमध्ये ख्याल आणि द्रुत एकतालात बंदिश सादर केली. त्यानंतर काफी रागात टप्प्याच्या अंगाने संवादिनी वादन सादर करून रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. त्याला जोडून पंडित पी. मधुकर यांची काफी रागातील गत सादर करत बंदिश खुलवत नेली. मैफलीची सांगता भैरवी रागातील ‘सुकतातची जगिं या’ या रचनेने केली. त्यांना सुनील जायफळकर (तबला) आणि स्मिता मनोहर (संवादिनी) साथसंगत केली.
पहिल्या सत्रात पंडित बोरकर यांचे शिष्य निरंजन लेले (मुबंई) यांचे संवादिनी वादन झाले. त्यांनी पूरिया कल्याण रागातील झपतालमधील काही गती सादर केल्या. तिलक देस रागातील दोन बंदिशी सादर करून पंडित छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेल्या देवमाणूस या नाटकातील ‘चांद माझा हा हासरा’ या नाट्यगीताने वादनाची सांगता केली.
प्रास्ताविकात श्रीराम हसबनीस यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कलाकारांचा सत्कार वसंतराव मराठे, ज्येष्ठ संवादिनी वादक सुधीर नायक यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर भावे यांनी केले.












