पिंपरी – खासदार साहेब गेले तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. पक्षातील लोकांनी खासदार साहेबांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. पण एक जीव गेला. दुसरा जीव मी जाऊ देणार नाही, याची काळजी मी घेणार, असे खळबळजनक वक्तव्य आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिभा धानोरकर या पत्नी आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.
आ. प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले की, खासदार साहेब गेल्यापासून आठ ते नऊ महिन्यांपासून जे लोक माझा सर्वाधिक विरोध करीत आहेत, तेच लोक मी भाजपात जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवत आहेत. त्यासाठी माध्यमांना पॅकेज देऊन चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. त्यांनी अशा कितीही अफवा पसरविल्या तरी त्याला मी घाबरणारी नाही.
मी काँग्रेसची आहे, मी काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार आहे. यावेळी शिवानी वडेट्टीवार आपली स्पर्धक नसल्याचे देखील आमदार धानोरकर म्हणाल्या.
चंद्रपूर ही माझी हक्काची जागा आहे, ती सोडणार नाही, असे स्पष्ट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही सांगितल्याचे त्यांनी म्हटले.