पुणे : किशोरदा मला छोटे बाबू म्हणत. सहा-सात वर्षे त्यांच्यासमवेत जवळपास शंभर लाईव्ह शो करण्याची संधी मिळाली तो काळ माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता, अशी आठवण प्रसिद्ध अकॉर्डिअन वादक आणि संगीत संयोजक विवेक परांजपे यांनी सांगितली. लतादिदी, आशाबाई आणि किशोरदा या दिग्गज कलाकारांबरोबर एकाच कालखंडात देश-विदेशात लाईव्ह शोज्मध्ये वादनाची संधी मिळालेला मी जगातील एकमेव कलाकार असेन अशा भावनाही त्यांनी मोठ्या नम्रतेने व्यक्त केल्या.
गानवर्धन आणि व्हायोलिन अकॅडमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 41व्या मुक्तसंगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विव्ोक परांजपे यांनी ‘सुगम संगीत व सिने संगीतातील संगीत संयोजन’ या विषयावर प्रात्यक्षिकांसह अनुभव कथन केले. ज्येष्ठ सिने पत्रकार सुलभा तेरणीकर यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, सचिव रवींद्र दुर्वे, व्हायोलिन अकॅडमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख, प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये स्वरमंचावर होते.

घरातच संगीत असल्याने संगीताविषयी लहानपणीच जाण निर्माण झाली. संगीताचे शिक्षण न घेताही नोटेशन काढता येणे ही माझ्यादृष्टीने दैवदत्त देणगीच आहे, असा बालपणापासूनचा आठवणींचा पट उलगडून सांगताना परांजपे म्हणाले, संगीत आणि हार्मोनियम वादनाची आवड असल्याने दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची आणि त्यातूनच मेलडी मेकर्स या जगप्रसिद्ध वाद्यवृंदात वादनाची संधी मिळाली. तेथेच अकॉर्डिअन वादनाची सुरुवात झाली. वाद्यवृंदातील वादनामुळे भारतरत्न लतादिदी, किशोरदा, पंचमदा, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळत गेली.
संगीत संयोजन म्हणजे काय याविषयी सांगताना परांजपे म्हणाले, संगीतकार ज्या प्रमाणे गाण्याला, शब्दांना चाल देतात त्याचवेळी संगीत संयोजक वाद्यमेळाद्वारे गाण्याला पूरक अशी वेगळी स्वरलिपी निर्माण करतात. संगीत संयोजकांना अनेक वाद्यांची माहिती असते ती माहिती संगीतकाराला असेलच असे नाही त्यामुळे संगीतकाराने संगीत दिलेले गाणे खुलविणे हे काम संगीतसंयोजक करतो. म्हणजे जणू एखाद्या मूर्तीला सजविण्याचे काम हे संगीत संयोजकाचे असते.
सॅबॅस्टियन, श्यामराव कांबळे, दत्ता डावजेकर, सोनिक आमी, इनॉक डॅनियल्स या दिग्गज संगीत संयोजकांच्या कार्यशैलीच्या आठवणी आणि महती विशद केली. तसेच सलील चौधरी, रवींद्र जैन, अनिल-अरूण, लक्ष्मीकांत-पारेलाल असे नामवंत संगीतकार हे उत्तम संगीत संयोजक होते हे ही त्यांनी नमूद केले.
स्वरमंचावर सादरीकरण करताना संगीत संयोजन करणे म्हणजे मूळ गाण्याची नक्कल वाजवावी लागते; परंतु स्टुडिओत गाण्याचे संयोजन करण्यासाठी संगीत संयोजकाच्या प्रतिभेला वाव आणि आव्हानही असते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 70-80च्या दशकातील संगीतकार व संगीत संयोजकांचे योगदान सांगताना परांजपे यांनी आर. डी. बर्मन, मनोहरी दा, बासू दा, मारुती कीर, रमाकांत म्हापसेकर, अमर हळदीपूर यांचा उल्लेख मानाने केला. मंगेशकर कुटुंबियांची महती सांगताना परांजपे यांनी स्टेज शोच्या आधी हे महान कलाकार तालमीला किती महत्व देत असत याचा आवर्जून उल्लेख केला
‘चिंगारी कोई भडके’, ‘हमे और जिनेकी चाहत ना होती..’, ‘शिशा हो या दिल हो’, ‘यु हसरतोंके साथ’ या आणि अशाच इतरही लोकप्रिय गीतांच्या संगीत संयोजनाची झलक त्यांनी की-बोर्डवर दाखविली. ‘सोला बरसकी बाली उमर को सलाम’, ‘ससा तो ससा’ या मेधा परांजपे यांनी गायलेल्या गीतांना वादनाची साथ त्यांनी केली. परांजपे यांनी कार्यक्रमाची सांगता ‘सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी…’ या गीताने केली.
परांजपे यांच्याशी मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला तर तबला आणि ऑक्टोपॅडवर समीर बंकापुरे यांनी साथ केली.
मुक्तसंगीत चर्चेविषयी दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत रवींद्र दुर्वे, दयानंद घोटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या कार्याध्यक्ष वासंती ब्रह्मे यांनी केले.












