पुणे : संगीत नाटक आणि कीर्तन यांचा जवळचा संबंध आहे. कीर्तन परंपरा ही संगीत नाटकाची गंगोत्री आहे. ते एकपात्री संगीत नाटकच असते, असे प्रतिपादन संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद पिळगांवकर यांनी केले. चारुदत्त आफळे यांनी कीर्तनाची समृद्ध परंपरा जतन करून ठेवली आहे. त्यांनी अथक परिश्रमाद्वारे स्वत:ची कारकीर्द उभी केली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
राष्ट्रीय कीर्तनकार, संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू गायक, रंगधर्मी चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांना मुंबई विद्यापीठाद्वारे विद्यावाचस्पती (पीएचडी) या पदवीने गौरविण्यात आले आहे. या निमित्त भरत नाट्य संशोधन मंदिर आणि विश्व मराठी परिषदेतर्फे आफळे यांचा आज (दि. 13) पिळगांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रम भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय संत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प. पू. मदनमहाराज गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटुकले, भरत नाट्य मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे, कार्याध्यक्ष अभय जबडे, चैतन्य कुंटे व्यासपीठावर होते. सत्कार सोहळ्यानंतर ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन झाले.
पिळगांवकर म्हणाले, आफळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते कीर्तन आणि संगीत नाटकाची समृद्ध परंपरा जपण्याचे काम उत्तम रितीने पार पाडत आहे.
ह. भ. प. मदनमहाराज गोसावी यांनी आफळे यांना विद्यावाचस्पती ही अत्युच्च पदवी मिळाल्याबद्दल आफळे यांचे अभिनंदन करून हा शोध निबंध ग्रंथरूपाने अभ्यासकांसमोर यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना चारुदत्त आफळे म्हणाले, वडिलांची इच्छा आणि कीर्तनकारांना भिक्षेकरी जमात समजले जात असे. हा शिक्का पुसून टाकण्यासाठी पीएचडी केली. विद्यावाचस्पती ही पदवी मिळविण्यासाठी कुटुंबिय आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान मिळाले. अभ्यासामुळे कीर्तन परंपरेतील अनेक गोष्टी माहिती झाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या यशात भरत नाट्य मंदिराचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हा शोधनिबंध ग्रंथ व सांगीतिक रूपाने लवकरच अभ्यासकांपर्यंत पोहोचेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी आफळे यांच्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्द उलगडून दाखविली. क्षितिज पाटुकले म्हणाले, आफळे नावाचे गारूड संपूर्ण महाराष्ट्रावर पसरले आहे. कीर्तन म्हणजे फक्त वारकरी परंपरा असा असलेला समज आफळेबुवा यांनी दूर केला आहे. कीर्तनाचे डिजिटायजेशन, दस्तावेजीकरण करण्याचे मोठे काम चारुदत्त आफळे यांनी केले. आहे.
रवींद्र खरे यांनी आफळे यांच्याबरोबर केलेल्या कार्याला उजाळा दिला. कीर्तन विश्वचे महेश शेंद्रे, स्वाती यादव, ललित कला केंद्राचे चैतन्य कुंटे, कीर्तनकार राजेंद्र मांडेलवाल, आफळे यांच्या भगिनी क्रांतिगीता महाबळ यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा परिचय प्रा. क्षितिज पाटुकले आणि प्रियंका डोळे–गोगटे यांनी केला तर सूत्रसंचालन चारुलता पाटणकर यांनी केले.












