पुणे : पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अशातच कुख्यात गुन्हेगार आंदेकर टोळीतील सदस्यांनी येरवडा कारागृहात अधिकाऱ्याला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे.
शेरखान पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी अधिकाऱ्याला मारहाण केली. यात पठाण हे गंभीर जखमी झाले आहेत. कारागृहातच अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
ही घटना आज (गुरुवारी) सकाळी येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक एकमध्ये घडली.
विकी कांबळे व प्रकाश रेणुसे हे आंदेकर टोळीचे सदस्य असून सध्या ते येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी आज सकाळी किरकोळ कारवणावरुन इतर दहा गुंडांना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कैद्यांनी केलेल्या मारहाणीत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली. तर उजवा हाथ फ्रॅक्चर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.