पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : कळमोडी पाणलोट विकास संस्था, राजगुरूनगर यांच्या तर्फे शनिवार दि. २९ रोजी नीलकमल लॉन्स, पुणे येथे पाणी परिषद व कृषी गौरव पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष श्री अशोकराव टाव्हरे व उपाध्यक्ष राजूशेठ खंडीझोड यांनी सदर कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असून श्री दिलीपराव चौधरी, श्री दिलीपशेठ माशेरे, श्री माऊलीशेठ साबळे, श्री भरतराव साकोरे, श्री सुरेश उमाप, ॲड.सुहास दौंडकर, श्री अक्षय गायकवाड, श्री जयप्रकाश दौंडकर, श्री सुनीलराव तोत्रे, श्री संदेश कळमकर, श्री सनी दौंडकर, श्री बाळासाहेब साकोरे,श्री सुभाषराव गोरडे या मान्यवरांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
कळमोडीच्या मुळ योजनेचा (खेडच्या पश्चिम भागातील व आंबेगावच्या सातगाव पठार भागातील गावांचा १९८ कोटींचा सुप्रमा मंत्रालयात प्रलंबित असणाऱ्या निधीस शासनाने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कार्यास सुरुवात करावी, कळमोडी योजनेची अंतिम मान्यता नाकारलेल्या खेडच्या पूर्व भागातील व शिरूरमधील थिटेवाडी बंधारा लाभक्षेत्रातील गावांसाठी शासनाने वेगळी प्रशासकीय मान्यता देऊन वंचित गावांना न्याय द्यावा, चास-कमान कालवा- वितरिका २८ वर्षापूर्वी जमीनी घेऊन बहुळ- साबळेवाडीतील शेतकऱ्यांना आजपर्यंत भुभाडे देण्यात आले नसून ते शासनाने तातडीने द्यावे, खेड व शिरूर तालुक्यात प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करताना मुळ संपादन शीटामध्ये गैरप्रकार करून दुसरे संपादन शीट करून ताबा देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. शासनाने चौकशी समिती बसवून न्याय मिळवून द्यावा या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये शेती, पशू संवर्धन, जल संवर्धन क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सामान्य शेतकऱ्यांना गौरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मुख्य उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अमोल कोल्हे,दिलीप मोहिते पाटील,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांची असणार आहे.
कळमोडी पाणी योजना ही १९५७ साली घोषित केली असून अजूनही कागदावरच आहे.ती कार्यान्वित व्हावी तिला निधी देण्यात यावा. पाणी परिषदेच्या दोन मागण्यांविषयी शासनाकडून न्याय देण्यात आला आहे.अधिवेशनात पाणी प्रश्न उपस्थित झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.पाणी परिषदे मार्फत जनजागृती करण्याचे काम आम्ही करत आहोत अशी माहिती कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष श्री अशोकराव टाव्हरे यांनी दैनिक राज्य लोकतंत्रशी बोलताना सांगितली आहे.












