पिंपरी-चिंचवड हद्दीतील निगडी पोलिस चौकीत कार्यरत असणार्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदार आणि एका खाजगी मध्यस्थाला पुण्याच्या लालुचपत विभागाने लाच घेताना ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस अंमलदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडले आहेत. निगडी पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक, अमोल प्रकाश कोरडे, सागर तुकाराम शेळके, पो.शिपाई , व खाजगी इसम सुदेश शिवाजी नवले, वय 43 वर्ष, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
या घटने बद्दल अधिक माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांनी त्यांच्याओळखीच्या व्यक्तीला हातऊसणे व बँकेमधुन कर्ज काढून पैसे दिले होते. सदरचे बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे ऊसणे दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यांनी त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी लोकसेवक अमोल कोरडे यांच्याकडे असल्याने तक्रारदार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लोकसेवक अमोल कोरडे, पोलीस शिपाई सागर शेळके व खाजगी इसम नवले यांनी 1,50,000/- रुपये लाचेची मागणी केली
लाच रक्कम नवले यांनी स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, निगडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे
खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली लाच – निगडित तिघांना अटक












