पुणे : विमाननगर भागातील एका माॅलमधून महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी न दिल्यास तरुणीचा खून करण्याची धमकी अपहरणकर्त्याने दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत तरुणीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार लातूरमधील असून त्यांची मुलगी पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. ती सध्या विमाननगर भागात राहायला आहे. तरुणीचे विमानगरमधील एका माॅलमधून अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्याने तरुणीच्या वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून नऊ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास मुलीला जीवे मारु, अशी धमकी देण्यात आली, अशी फिर्याद तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.
तरुणीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. तरुणीच्या अपहरणामागचे निश्चित कारण समजले नाही. तरुणी प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचा संशय आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.