पुणे प्रतिनिधी
पुणे 20 – खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुदतबाह्य औषधे व इंजेक्शनचा साठा सापडण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच धरण व जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची रासायनिक तपासणी करून अहवाल तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिले आहे. खडकवासला धरण परिसरातील गावांमधून प्रदूषित पाणी धरणात सोडले जात आहे, याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यावर महापालिकेने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.
आता पाणलोट क्षेत्रात मुदतबाह्य औषधसाठा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. हा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच, धरणातील पाणी व सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची त्वरित तपासणी करावी, आवश्यक ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असेही कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.












