पुणे । प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : महापालिकेने खराडी भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय। घेतला होता. पण त्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाल्याने अखेर महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. या भागात आता शहरातील इतर भागाप्रमाणे दर गुरुवारी पाणी बंद असणार आहे.
धरणातील पाणी साठा कमी झाल्याने महापालिकेने पाणी बचतीसाठी दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करताना खराडी, चंदननगर, मथुरानगर, संघर्ष चौक, वृंदावन सोसायटी, चौधरी वस्ती, सातववस्ती, गुलमोहर, शंकरनगर, गणपती सोसायटी,बराटेवस्ती, थिटे नगर, पाटील बुवानगर सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर यासह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला.
ज्या भागातील पाणी पुरवठा व्यवस्थित होता, तेथे एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे
पाणी पुरवठा विस्कळित झाला. याविरोधात नागरिकांनी, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यामुळे अखेर या भागातील एक दिवसाआड पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘खराडी भागातील एक दिवसा आड पाणी पुरवठ्याचे नियोजन हे प्रायोगिकतत्वावर होते.
पण त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याने हा निर्णय मागे घेतला आहे. शुक्रवारपासून या भागात नियमीत पाणी पुरवठा होईल.












