पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापले आहे. एका धनिकाच्या अल्पवयीन मुलाने लायसन्स नसताना आणि दारूच्या नशेत असतानाही ही कार भरधाव वेगाने चालवून बाईकला धडक दिली, ज्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. आठवड्याभरापासून चालू असलेल्या या केसमध्ये रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत.
या अपघाताच्या घटनेनंतर मात्र पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग , महापालिका हे अनधिकृत पब वरील कारवाईसाठी चांगलीच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगर, मुंढवा भागातील १४ पब, बारवर कारवाई केली. बॉलर पबवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
मद्य विक्री नियमावलीचे, एक्साईज रजिस्टरमध्ये नोंदी योग्य नसल्याने या पबवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ” मद्य विक्री नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूफ हॉटेल्सविरोधात कारवाई करण्यात आली आहे.”
आठवडभरात ५४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. परवाना निलंबित केल्यानंतर संबंधित बार, पब सील करण्यात आले आहेत. कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, बाणेर-बालेवाडी भागातील पब, बारविरोधात कारवाई करण्यात आली. शनिवारी रात्री तरुणाईची या भागात गर्दी असते. एकाच वेळी १४ पब, बारविरोधात कारवाई करून त्यांना सील करण्यात आल्याने या भागात कमालीची शांतता पाहण्यास मिळाली.
दरम्यान, “आमच्यावरच कारवाई का कालपर्यंत हेच विभाग आमच्याकडून हप्ते खात होते, मग अचानक कारवाई का?” असा प्रश्न पब व्यावसायिक उपस्थित करीत आहेत.
याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मुळात ‘पब’ असा काही वेगळा परवाना नसतो. परमिट रूम आणि पब यांचा परवाना सारखाच असतो. जिथे म्युझिक आहे, डान्सफ्लोर आहे, त्याला ‘पब’ म्हटले जाते. पण, त्यासाठी काही तसे नियम नाहीत. आजचे नियम एवढे विचित्र आणि क्लिष्ट आहेत की पुण्यातील सर्व परमिट रूम बंद करावे लागतील. मग, आता जे सुरू आहेत, त्यांच्याकडून नियमांचे किती उल्लंघन होते, हे पाहिले जात नाही का? उद्या सगळ्याच बारना कुलूप ठोकावे लागेल. काही निवडक पबना टाळे ठोकणे बरोबर नाही, असे या मालकांचे म्हणणे आहे. पबमालक नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याचा अर्थ पोलिस, एक्साइज, महापालिका हेही नियम पायदळी तुडवत असतात. नियम बदलून बंगल्यात पब सुरू होतात, तेव्हा महापालिका काय करते, असा सवाल आहे. आज जे नियम आम्ही मोडले असे वाटते, ते इतके दिवस यांना दिसत नव्हते का? असे विचारत यंत्रणा काय करते? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.