राज्यसभेची खासदारकी मिळाल्यावर भाजपमध्ये ‘हेविवेट’ लीडर ठरलेल्या खासदार मेधा कुलकर्णी आता पुन्हा जुन्या ‘स्टाइल’ने कामाला लागल्या आहेत. ‘सबका साथ…सबका विकास’चा नारा घुमवत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांसाठी आखलेल्या दीड डझन ‘प्रोजेक्ट्स’च्या फायलींचा गठ्ठा हातात घेऊन खासदार मेधा कुलकर्णी महापालिका आयुक्तांच्या पुढे बसणार आहेत. साऱ्या प्रकल्पांचा हिशेब घेऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पुण्याच्या माजी कारभाऱ्यांना ‘कामाला’ लावण्याचा मेधा कुलकर्णींचा इरादा असू शकतो.
खासदार झाल्यानंतर महापालिकेच्या कामात लक्ष घालण्याच्या तयारीने मेधा कुलकर्णींनी महापालिका आयुक्तांकडे मीटिंगसाठी पत्र दिले. परंतु, बदलीच्या चर्चेने हैराण झालेल्या विक्रम कुमारांनी अजूनही मीटिंगसाठी वेळ काढलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णींचा पारा चढण्याची शक्यता आहे.
विक्रम कुमारांच्या ‘मेसेज’ची वाट पाहणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी दुपारी नवे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचे कार्यालय गाठून कामांचा पाढा वाचला. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता त्या महापालिकेत धडकण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या मीटिंगमध्ये मेधा कुलकर्णी या कोण्या कारभाराच्या काळातील, कोणत्या फायलींवर चर्चा करणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.