पुणे: पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे.
यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक १९ ते २९ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.
उत्सवकाळात होणारी गर्दी पाहता ट्रस्टतर्फे श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ५ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपाच्या दोन्ही मागील बाजूस लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी तीन एलईडी स्क्रिन तसेच बेलबाग चौक, बुधवार चौक येथे दोन स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारेwww.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.












