पुणे प्रतिनिधी
दि.१६ : गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात पीएमपीएमएलच्या जादा बसेस रस्त्यावरत धावणार आहेत. तसेच रस्त्यांवरील गर्दीमुळे तसेच गर्दीमुळे रस्ते बंद असले तरी पर्यायी मार्गाने वाट काढत या पीएमपीएमएलच्या बसेस धावणार असून रात्री दोन वाजेपर्यंत नागरिकांना या बसेस मधून प्रवास करता येणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येणाऱ्या तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे.
देशभर प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यातील गणपतीची रोषणाई, सजावट आणि देखावे पाहण्यासाठी नजीकच्या उपनगरातून आणि बाहेरगावहून गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी प्रमाणे यंदाही रात्रभर तब्बल ६५४ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
नागरिकांच्या सोयीनुसार पीएमपीएमलकडून पहिल्या टप्प्यामध्ये २० ते २१ ऑगस्ट दरम्यान आणि २७ ऑगस्ट रोजी १६८ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजेनुसार २२ ते २६ ऑगस्ट आणि २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ६५४ जादा बसेस नियोजन करण्यात आले आहे.












