पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तळेगाव दाभाडे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पथसंचलन करण्यात आले.
सध्या गणेशोत्सव आनंदी वातावरणात सुरु आहे. गणेशोत्सव मंडळांकडून आकर्षक सजावटी आणि देखावे सादर करण्यात आले आहेत. देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. रात्रीच्या वेळी शहरात मोठी गर्दी होते. या गर्दीत चोरी तसेच महिलांची छेडछाडीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. खाकीचा धाक दाखवण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यासाठी पथसंचालन केले गेले. यामध्ये तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील या पथसंचलनामध्ये सहभागी झाली होती. अनुचित प्रकार घडल्याचे निदर्शनास येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












