पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : गणेश चतुर्थी निमित्त पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी हे गिफ्ट मिळाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दलातील ३९० पोलीस शिपाई, नाईक ते हवालदार पदावर तर चार अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
२५ मे २००४ पूर्वी पोलीस दलात रुजू झालेल्या अंमलदारांना यावर्षी सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होऊन पाच वर्ष उलटली आहेत. अजूनही आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता आहे. आजवर शहरात आलेल्या पाचही पोलीस आयुक्तांनी मनुष्यबळ वाढीसाठी प्रयत्न केले. दरम्यान पोलीस शिपाई पदावर सुमारे दोनशे भरत्या देखील झाल्या आहे. इतर जिल्ह्यातून बदलीवर येणारे अंमलदार, पोलीस भरती मधून मिळालेले अंमलदार अशांची मोट बांधून आयुक्तालयाची कामे चालवली जात आहे. आगामी गणेशोत्सव आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाला बाहेरून अधिकची कुमक मागवावी लागते. दरम्यान बंदोबस्तासह घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी देखील राखीव मनुष्यबळ ठेवावे लागते. असे असतानाच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३९४ पोलीस अंमलदारांना आनंदाचा धक्का दिला. पोलीस शिपाई आणि नाईक पदावरून ३९० जणांना हवालदार पदी बढती दिली आहे.
पोलीस दलात ३० वर्ष सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या चार अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती दिली आहे. मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे, वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर आणि वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेराव यांना ही बढती मिळाली आहे.
पोलीस नाईक पद रद्द
सर्वसाधारपणे एका पदावर दहा वर्षे सेवा कालावधी झाल्यानंतर पदोन्नती मिळते. पोलीस शिपाई पदावर भरती झालेल्या अंमलदाराला पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वयाच्या अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. त्यामुळे पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील अंमलदाराचे पोलीस नाईक हे पद रद्द केल्यामुळे अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार दहा वर्षानंतर पदोन्नतीने पोलीस हवालदार होता येईल. त्या अंमलदारांची २५ वर्ष सेवा पोलीस दलाकरीता गुन्हे तपासासाठी मिळेल, असा विचार करत गुह विभागाने फेब्रुवारी २०२२ मध्ये पोलीस नाईक हा संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक या दोन्ही संवर्गातील अंमलदारांना पोलीस हवालदार पदावर बढती दिली जात आहे.
पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करण्यात आली आहे. यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे, असे सांगत बढती मिळालेल्या अंमलदारांचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन केले.












