पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२२ : पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली होती. या कारवाईत सुमारे साडे तीन लाख रुपये किंमतीचे १५० ग्रॅम अफिम व ६३२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. एक इसम आणि एका महिलेला भारती विद्यापीठ व हडपसर परिसरातून अटक केली गेली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडून करण्यात आली आहे.
हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुरुवार दि.२० रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. मांजरी मुंडवा रोड वरील गवळी वस्ती, येथे एक महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर व संदीप शिर्के यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात एन.डी.पी.एस ॲक्ट ८ (क) २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शुक्रवार दि. २१ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना भारती विहार सोसायटी गेट समोर अफीमची विक्री होत असल्याची बातमी पोलीस अंमलदार पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना मिळाली. त्या अनुषंगाने वीरमाराम कोजाराम विश्नोई (वय ३० रा.टिळेकर नगर, कोंढवा मूळ ता. घोरीमन्ना, जि. बाडमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून ३ लाख रुपये किंमतीचा १५० ग्रॅम अफिम व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात एन.डी.पी.एस ॲक्ट ८ (क) १७ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे-१ सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,शैला जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर,ज्ञानेश्वर घोरपडे,मारुती पारधी,प्रवीण उत्तेकर व संदीप शिर्के,पांडुरंग पवार व सचिन माळवे, विशाल दळवी, मनोज कुमार साळुंखे, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव,रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
गांजा व अफिम विकणाऱ्या दोघांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई












