पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘ऱ्हिदम कोलाज‘ अर्थात लोक–तालवाद्य कचेरी या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. लोककला सादर करताना वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक तालवाद्यांचे एकत्रित सादरीकरण या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे.
तालवद्याचे वादन, साथसंगत आणि परंपरा सांगणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना संजय करंदीकर यांची असून यात प्रथमेश देवधर, मयूर जोशी, विनीत तिकोनकर, सारंग बुलबुले, सचिन माईणकर, सुजित लोहार, सोमनाथ तरटे, सुरज तरटे, गणेश बोज्जी, ओंकार घाडगे, अभिजित पंचभाई, चित्रा आपटे, दिप्ती कुलकर्णी, विनायक पवार यांचा समावेश आहे. तालवाद्य संयोजन नितीन सातव, रोहित जाधव आणि पवन अवचरे यांनी केले आहे. संजय करंदीकर यांना भारत सरकारचे सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस ॲण्ड ट्रेनिंग (सीसीआरटी) यांच्यातर्फे सिनिअर फेलोशिप प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या निमित्ताने करंदीकर यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












