पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ :
गानवर्धन आणि उपाध्ये व्हायोलिन अकॅडमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 28 आणि शनिवार, दि. 29 जुलै रोजी 41व्या मुक्तसंगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम दोनही दिवस सायंकाळी 5:30 ते 8:30 या वेळात एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे.
सुगमसंगीत आणि चित्रपट क्षेत्रात गेली 40 वर्षे संगीत संयोजन करणारे, भारतरत्न लतादीदी, आशाताई यांच्यापासून ते हरीहरन, सोनू निगम यांच्यासह जगभरात हजारो कार्यक्रम करणारे पुण्यातील ख्यातनाम कलाकार सिंथेसायझर आणि अकॉर्डियन वादक विव्ोक परांजपे शुक्रवार, दि. 28 जुलै रोजी प्रात्यक्षिकांसह अनुभव कथन करणार आहेत. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पंडित गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे हे ‘कुमार गंधर्व गायकी व परंपरा’ या विषयावर शनिवार, दि. 29 जुलै रोजी विवेचनासह सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारार्थ गानवर्धन संस्था गेली 42 वर्षे सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहे. मुक्त संगीत चर्चासत्राची संकल्पना संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी यांची असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दयानंद घोटकर संयोजन करीत आहेत.
संगीत क्षेत्रातील विविध विषयांवर मान्यवर कलाकार, विचारवंत, बुजुर्ग यांचे सप्रयोग विवेचन असे या चर्चासत्राचे स्वरूप असते. यामधील वैचारिक मंथनावर गानवर्धन संस्थेने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत ग्रंथही प्रकाशित केले आहेत. गायन, वादन, नृत्य या तीनही शाखेतील अभ्यासपूर्ण लेख या ग्रथांमध्ये आहेत, असे घोटकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












