पुणे प्रतिनिधी
पुणे,दि.२८:गुरुजनांकडून मिळालेला सांगीतिक वारसा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या कलाकारांचा सप्रयोग आणि संवादात्मक अशा वेगळ्या धाटणीचा ‘गुण घेईन आवडी शिष्य परंपरा‘ हा कार्यक्रम गुरुवारी (दि. ३१) आयोजित करण्यात आला आहे.अशी माहिती अरविंद परांजपे यांनी निवेदनाद्वारे दिली.
पंडित कमलाकार जोशी शिष्यपरिवार आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
‘गुण घेईन आवडी‘ या मालिकेतील हे चौथे पुष्प आहे. अभिजात संगीत परंपरा पुढे नेणारे दोन कलाकार या कार्यक्रमातून रसिकांना भेटतात. त्यांनी गुरूंचे गुण कसे आत्मसात केले आणि ते त्यांच्या शिष्यवर्गाला कशा पद्धतीने तयार करीत आहेत याचा सप्रयोग मागोवा घेणारा हा संवादात्मक कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमात गुरूंच्या सांगीतिक विचारांचे सादरीकरण मेघना सरदार (गुरू पंडित उदय भवाळकर) आणि कविता खरवंडीकर (गुरू पंडित बबनराव हळदणकर) करणार आहेत. त्यांच्याशी नेहा लिमये संवाद साधणार असून कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), शुभदा आठवले (हार्मोनियम), गणेश फपाळ (पखवाज) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












