पिंपरी चिंचवड, 4 जुलै 2023: कुख्यात गुन्हेगार सोन्या तापकीर याच्या हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याचा विचार करत होते.
ही घटना 22 मे रोजी घडली होती, तेव्हापासून आरोपी फरार होते. करण रतन रोकडे (वय 25, रा. चिखली, पुणे), ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि रिंकू दिनेश कुमार (वय 19 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोन्या तापकीरला दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार करण्यात आले, करण रोकडे हा मुख्य गुन्हेगार होता आणि इतरांनी त्याला मदत केली. हत्येनंतर आरोपी शहरातून पळून गेले. चिखली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि १२० (ब) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये सतत फिरून अटक टाळत होते. त्यांनी वारंवार निवासस्थान बदलले आणि त्यांची ओळख लपवली. तथापि, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी शाम बाबा यांना मुख्य संशयित करण रोकडे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर हि कारवाई करण्यात आली. तत्परतेने कार्य करत, पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात पोहोचले,आरोपी मथुरेपासून अंदाजे 750 किमी अंतरावर असलेल्या मधुबन येथे स्थलांतरित झाल्याचे समजले.
पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या इमारतीला घेराव घातला, मात्र पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच करण रोकडे आणि त्याचे तीन साथीदार पहिल्या मजल्यावरून उडी मारून जवळच्या शेतात पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून करण रोकडे याला पकडण्यात यश मिळविले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुन्हा पिंपरी चिंचवड येथे आणून मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर न्यायालयाने पुढील तपासासाठी 6 जुलैपर्यंत कोठडी मंजूर केली आहे. चिखली पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
डीसीपी (गुन्हे शाखा) स्वप्ना गोरे, एसीपी सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही.माने, सागर पानमंद तसेच पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभीरे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख, नागेश माळी, पोपट हुलगे यांचा समावेश होता.
गुन्हेगार सोन्या तापकीरच्या मारेकऱ्यांना उत्तर प्रदेशातून अटक












