पुणे प्रतिनिधी
पुणे : गणेशोत्सवात गेल्या वर्षी लांबलेली मिरवणूक यंदा लवकर पूर्ण होणार का, याबद्दल नागरिकांत उत्सुकता आहे. गेल्यावर्षी मिरवणूक संपण्यासाठी तब्बल ३१ तास लागले होते. मिरवणूक यंदा वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मंडळांशी त्यांची सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे नियोजनानुसार सर्व काही घडले तर, मिरवणूक वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा विसर्जन मिरवणुकीत सायंकाळी चार वाजता सहभागी होण्याची घोषणा केली आहे. तर, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बाबू गेनू मंडळ आणि जिलब्या मारुती मंडळाने मिरवणुकीत सायंकाळी सहाच्या सुमारास मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. मानाचे गणपती आणि अन्य काही मंडळे बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यावर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला विसर्जन मिरवणुकीत सोडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गेल्या काही वर्षांतील मिरवणूक
२०२२ – ३१ तास
२०१९ – २४ तास
२०१८ – २७ तास १५ मिनिटे
२०१७ – २८ तास ०५ मिनिटे
२०१६ – २८ तास ३० मिनिटे
(कोरोनामुळे २०२०, २१ मध्ये मिरवणुका निघाल्या नव्हत्या)












