पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.०४ : मोठ्या शहरांमध्ये सांस्कृतिक चळवळी होतात. पण हे काम ग्रामीण भागातही झाले पाहिजे. कलेची साधना सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तबलावादक तालऋषी पंडित अनिंदो चटर्जी यांनी व्यक्त केले.नृत्यकला मंदिर तर्फे संचालिका तेजश्री अडीगे यांच्या पुढाकारातून मेघ मल्हार संगीत महोत्सव निगडी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात उर्मिला कानेटकर यांना अश्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तबलावादक तालऋषी पंडित अनिंदो चटर्जी (कोलकाता), कमला एज्युकेशन सोसायटी आणि प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स चिंचवडचे सचिव लायन डॉ. दीपक शहा, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, उर्मिला कानेटकर, आरती अंकलीकर, तेजश्री अडिगे, माजी नगरसेवक अमित गावडे आदी उपस्थित होते.
पंडित अनिंदो चटर्जी म्हणाले, “या कार्यक्रमाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. नृत्य, गायन, वादन करून केवळ अर्थार्जन करणे हा उद्देश नाही. तर पुढच्या पिढीला हे ज्ञान देणं यातली महत्वाची बाब आहे. पुढच्या पिढीला ज्ञान देण्याचे काम सर्वांकडून होत नाही. तेजश्री अडिगे यांच्या सारख्या व्यक्तींकडून हे काम होते. मोठ्या शहरांमध्ये सांस्कृतिक चळवळी होतात. पण हे काम ग्रामीण भागातही झाले पाहिजे. कलेची साधना सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे. प्रेक्षकांनी देखील याला दाद दिली पाहिजे.”
पुरस्काराला उत्तर देताना उर्मिला कानेटकर म्हणाल्या, “अश्विनी पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. अश्विनी एकबोटे यांच्यासोबत एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद होत आहे.”
पंडित डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले, “तेजश्री अडिगे यांनी मेघ मल्हार हा खूप चांगला कार्यक्रम सुरू केला आहे. त्यात मी देखील कथ्थक नृत्य केले आहे. त्यांचे काम खूप मोठे आहे.”
पंडित अजय पोहनकर म्हणाले, “नृत्य कला मंदिर खूप चांगले काम करीत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये अशा प्रकारचे काम होणे फार आवश्यक आहे.”
ला. दीपक शहा म्हणाले, “तेजश्री अडिगे यांनी नृत्य कला मंदिरच्या माध्यमातून शहरात शास्त्रीय नृत्यासाठी खूप चांगले मंच उपलब्ध करून दिले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. अनेक ठिकाणी संस्थेचे आणि शहराचे नाव उज्वल करीत आहेत.”

संचालिका तेजश्री अडिगे यांनी मेघ मल्हार संगीत महोत्सवाचा सन 2010 पासूनचा प्रवास उलगडला. पिंपरी चिंचवड शहरातील लोकांमध्ये तेजश्री अडिगे यांनी शास्त्रीय नृत्याची आवड निर्माण केली. पिंपरी चिंचवड शहरात शास्त्रीय नृत्याची बीजे रोऊन त्याला विकसित करण्याचा प्रयत्न नृत्य कला मंदिरच्या वतीने केला जात आहे. नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थ्यांनी देशभरात अनेक मोठ्या मंचावर शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले. चित्रपटांमध्ये देखील अनेकजण काम करीत आहेत. विद्यार्थी घडविण्याचे हे काम यापुढेही अविरत सुरू राहील, अशा भावना तेजश्री अडिगे यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पंडित अनिंदो चटर्जी यांनी तेजश्री अडिगे यांचा सन्मान केला. रत्ना दहीलकर यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश अडिगे यांनी आभार मानले. अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांनी कथक नृत्य सादर केले. यावेळी तबला साथ पंडित कालिनाथ मिश्रा, वोकल वैभव मांडकर, सितार अल्ताफ खान यांनी केली. जगविख्यात गायिका पंडिता आरती अंकलीकर टिकेकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना हार्मोनियम अभिनय रावंडे, तबला प्रशांत तांडव यांनी साथ दिली. नितीश पुरोहित यांनी सरोद वादन केले, समीर सूर्यवंशी यांनी त्यांना तबला साथ केली.
महोत्सव समितीत अविनाश अडीगे, नीरजा आपटे, तेजश्री प्रभू, उमा पाटील, वाय व्ही रत्नम, तेजस चव्हाण, जगदीश चीपकर, प्रशांत शिंदे, तुषार जंगले, शिरीष कुंभार, पल्लवी क्षीरसागर, संजीवनी खत्री, कीर्ती राजगोपाल यांनी काम केले. तर सल्लागार समितीत गुरू डॉ. सुचेता भिडे चापेकर, पं. किरण परळीकर, प्रवीण वाळिंबे, प्रवीण तुपे यांनी काम केले.
अश्विनी पुरस्काराबद्दल
शास्त्रीय नृत्या बरोबरच अभिनयाच्या विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या अभिनेत्रींचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो. यापूर्वी शास्त्रीय नृत्यातील योगदानाकरिता शर्वरी जमिनीस आणि सुकन्या कुलकर्णी मोने या अभिनेत्रींना नृत्य कला मंदिरच्या वतीने अश्विनी पुरस्कार देण्यात आला आहे. प्रख्यात अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. नृत्य कला मंदिरच्या वतीने सन 2010 पासून दरवर्षी मेघ मल्हार संगीत महोत्सव आयोजित केला जातो. संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संचालिका तेजश्री अडीगे यांनी अश्विनी एकबोटे यांच्या स्मृती जागविण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून अभिनेत्री, नृत्यांगना उर्मिला कानेटकर यांना यावर्षीचा अश्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, रोख रक्कम 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.












